Monday, February 1, 2021
आदिवासी क्षेत्रातील किल्ले
Thursday, January 28, 2021
सातमाळा डोंगररांगा, महाराष्ट्र.
सातमाळा
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर भागातील सह्याद्रीचा एक फाटा. दख्खनच्या पठारी प्रदेशाच्या पश्चिम कडेवर उत्तर-दक्षिण पसरलेल्या सह्याद्री (पश्चिम घाट) या पर्वतश्रेणीच्या मुख्य रांगेपासून पूर्वेस किंवा आग्नेयीस अनेक डोंगररांगा किंवा सह्याद्रीचे फाटे गेलेले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या सीमेअंतर्गत तापी-पूर्णेच्या दक्षिणेस सातमाळा-अजिंठा, हरिश्चंद्रगड-बालाघाट व महादेवाचे डोंगर या तीन प्रमुख डोंगररांगा आहेत [⟶ बालाघाट; महादेवाचे डोंगर]. उत्तरेकडील तापी व दक्षिणेकडील गोदावरी नदी यांदरम्यान सातमाळा-अजिंठा, उत्तरेस गोदावरी व दक्षिणेस भीमा नदी यांदरम्यान हरिश्चंद्रगड-बालाघाट, तर उत्तरेस भीमा व दक्षिणेस कृष्णा नदी यांदरम्यान महादेवाचे डोंगर आहेत. सह्याद्रीच्या मुख्य समूहात या सर्व श्रेण्यांचा प्रारंभ होत असून त्या पूर्व किंवा आग्नेय दिशेस पसरल्या आहेत.
महाराष्ट्र राज्यातील या प्रमुख डोंगररांगांपैकी सर्वांत उत्तरेकडील, साधारणतः पश्चिम-पूर्व दिशेस पसरलेल्या तापी व गोदावरी यांदरम्यानच्या, डोंगररांगा ‘सातमाळा-अजिंठा’ या नावाने ओळखल्या जातात. सामान्यपणे या डोंगररांगांच्या पश्चिमेकडील भागास सातमाळा व पूर्वेकडील भागास अजिंठ्याचे डोंगर असे संबोधले जाते. सातमाळा डोंगररांगांना चांदवड, चांदोर किंवा इंध्याद्री म्हणूनही ओळखतात. या डोंगररांगांचा प्रारंभ नासिक जिल्ह्याच्या वायव्य भागामध्ये सह्याद्रीच्या मुख्य समूहात होतो. मुख्य सह्याद्रीपासून पूर्वेस ८० किमी. पर्यंत बेसॉल्ट खडकातील विलक्षण अशा कटक व सुळक्यांच्या स्वरूपात ही रांग पसरली आहे. मनमाडजवळील मंद उताराच्या खळग्यानंतर पुन्हा या डोंगररांगा मैदानी भागापासून १८२ मी. उंचीपर्यंत वाढत गेलेल्या आहेत. अजिंठ्याच्या पुढे काही किमी.वर या डोंगररांगा दक्षिणेस वळून पठारी प्रदेशात विलीन होतात. नांदेड जिल्ह्यातील यांच्या विस्तारित डोंगररांगांना निर्मळ आणि सातमाळा डोंगररांगा असे म्हणतात. यांचा विस्तार पुढे आंध्र प्रदेशात झालेला दिसतो.
नासिक, औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यांत सातमाळा-अजिंठा डोंगररांगांचे फाटे पसरले आहेत. नासिक जिल्ह्याच्या साधारण मध्यातून या डोंगररांगा गेल्या असून तेथे त्यांची सस.पासून सरासरी उंची १,१००–१,३५० मी. दरम्यान आढळते. धोडप व सप्तशृंगीसारखी काही शिखरे सस.पासून १,४००मी. पेक्षा उंच आहेत. अचल व जावाता हे किल्ले या रांगेत आहेत. औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तर सरहद्दीवरून गेलेल्या या डोंगररांगांना अजिंठ्याचे डोंगर असे म्हणतात. अंजिठा, पाटणा, चांदोर येथील डोंगरकपाऱ्यांत कोरलेली बौद्घ लेणी ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या साधारण मध्यातून या डोंगररांगा गेलेल्या आहेत.
सातमाळा डोंगररांगामध्ये काही अरण्यांचे पट्टे आढळतात. काही भागांतील डोंगरांचे उतार उघडे असून काही भागांत विखुरलेल्या वनस्पती पहावयास मिळतात. डोंगररांगांच्या दरम्यान असलेल्या प्रवाहांच्या पात्रांत व काठावरील भागात दाट झाडी व झुडूपे आढळतात. प्रामुख्याने उष्णकटबंधीय शुष्क पानझडी प्रकारची वृक्षराजी या भागात आढळते. साग, ऐन, हिरडा, कुसुम, आवळा, पळस, खैर, शिसव, अंजन, शिरीष, शेवरी इ. वृक्षप्रकार येथील जंगलांत पहावयास मिळतात. अरण्यमय प्रदेशात वन्य पशु-पक्षी आढळतात. वाघ, कोल्हा, रानडुक्कर, ससा, भेकर, मुंगूस, काळवीट, सायाळ इ. प्राणी व मोर, रानकोंबडा, चंडोल, पोपट, कोकिळ, ससाणा, दयाळ इ. पक्षीही तेथे आढळतात.
सातमाळा डोंगररांगांपैकी उत्तरेकडील काही सोंडींच्या उताराच्या भागात तसेच मुख्य रांगेच्या पायथ्यापर्यंत लागवडीखालील क्षेत्र आहे. या डोंगररांगांमध्ये भिल्ल, गोंड, परधान, कोलाम या आदिवासी जमातींचे लोक राहतात. चाळीसगावजवळील रांजणगाव किंवा औलाम खिंड आणि अंजिठा खिंड या दोन खिंडींमधून प्रमुख मार्ग गेलेले आहेत. पश्चिमेकडील डोंगररांगांमध्ये निसर्गसुंदर गिरिस्थाने आढळतात.
विंध्य पर्वताच्या पश्चिमेस मध्य प्रदेश व गुजरात राज्यांच्या सरहद्दीदरम्यान असणाऱ्या डोंगररांगांनाही सातमाळा या नावाने ओळखले जाते.
चौधरी, वसंत
Sunday, January 24, 2021
शिवनेरी किल्ला, महाराष्ट्र.
![]() |
| शिवजन्म स्थळ, किल्ले शिवनेर. |
इतिहास
‘जीर्णनगर’. ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे शहर इसवीसनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मीती करण्यात आली. सातवाहनाची सत्ता स्थिरवल्यानंतर येथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतली. सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक-उल-तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला इ.स.अ १४७० मध्ये मलिक-उल-तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंदी करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्युनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजामाता गरोदर असताना जाधवरावांनी ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. त्याऊपर शिवाजीराजे यांचा जन्म झाला. शके १५५६ क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार इ.स. १६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरुद्धा येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. इ.स. १६७३ मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले. पुढे ४० वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहुमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्याकडे हस्तांतरीत करण्यात आला
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणेे
सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर येतांना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यावर मुख्य वाटसोडून उजव्या पूढे गेल्यावर ‘शिवाई देवीचे’ मंदिर लागते मंदीराच्या मागे असणाऱ्या कड्यात ६ ते ७ गुहा आहेत. या गुहा मुक्कामासाठी अयोग्य आहेत. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे. शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. आजमितीस या अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. मात्र पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात. एक वाट समोरच असणाऱ्या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते. वाटेत गंगा, जमुना व याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात. जिजाउंच्या पुढ्यात असलेला बालशिवाजी , हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे, अशा आवीर्भातील मायलेकरांचा पुतळा ‘शिवकुंजा; मध्ये बसविला आहे. शिवकुंजासमोरच कमानी मशिद आहे आणि समोरच खाली पाण्याचे टाके आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो. येथूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलॊत जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथे शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला आहे. इमारतीच्या समोरच ‘बदामी पाण्याचे टाके’ आहे येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो. सुमारे दिड हजार फुट उंचीचा ह्या सरळसोट कड्याचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे. गड फिरण्यास २ तास पुरतात. वर किल्ल्यावरून चावंड, नाणेघाट आणि जीवधन तसेच समोर असणारा वडूज धरणाचा जलाशय लक्ष्य वेधून घेतो.
गडावर जाण्याच्या वाटा
गडावर जाण्याच एदोन प्रमुख मार्ग जून्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते.
साखळीची वाट
या वाटेने गडावर यायच एझाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने शिवपुतळ्यापाशी यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात. डाव्या बाजूस जाणाऱ्या रस्त्याने साधारणतः एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरसमोर जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या साह्याने आणि कातळाट खोदलेल्या पाऱ्यांच्या साह्याने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो.
सात दरवाज्यांची वाट
शिवपुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायऱ्यांपाशी घेऊन जातो . या वाटेने गडावर येतांना सात दरवाजे लागतात. पहिला महारदवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा, या मार्गेकिल्ल्याव्र पोहचण्यासाठी दीड तास लागतो.
मुंबईहून माळशेज मार्गे
जुन्नरला येतांना माळशेज घाट पार केल्यावर ८ ते ९ किलोमीटवर ‘शिवनेरी १९ कि.मी.’ अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेशा खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहचण्यास एक दिवस लागतो.
या किल्ल्यावर शिवकुंजाच्या मागील बाजूस असणाऱ्या वऱ्हांड्यामध्ये १० ते १२ जणांची रहाण्याची सोय होते. किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती व्यवस्था आपण स्वतःच करावी. गंगा व जमुना या टाक्यांमध्ये बारामही पिण्याचे पाणि उपलब्ध आहे. गडावर जाण्यासाठी साखळीच्या मार्गेपाउण तास, सात दरवाजा मार्गे दीड तास लागतो.
माहिती संकलन - अमरीन पठाण
कृपया ब्लॉगला सबस्क्राईब/फॉलो करा म्हणजे पुढिल पोस्टचे अपडेट्स तुम्हाला मिळतील.
Saturday, January 23, 2021
अंजनेरी, नाशिक.
त्र्यंबकेश्वर जवळ हनुमानाचं जन्मस्थळ म्हणून ओळखला जाणारा अंजनेरी पर्वत देव दर्शनाच्या दृष्टीनं जितका महत्त्वाचा तितकाच ट्रेकींगचा थ्रिलिंग अनुभव देणारा. नाशिक-त्र्यंबक मार्गाच्या साधारणपणे ३० किलोमीटर अंतरावर अंजनेरीला जाण्यासाठी फाटा आहे. मारूतीरायाचं दर्शन घेतल्यावर अंजनेरी पर्वत चढाईसाठी मार्गक्रमण सुरू होतं. रस्त्यात लागणारं अंजनेरी गाव ओलांडून अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी येताच या डोंगराची विशालता लक्षात येते. अंजनेरी गावातून किल्ल्यावर पोहोचताच वाटेतच म्हणजे पाय-यांच्या ठिकाणी गुहेत जैनधर्मीय लेणी आढळतात. काही अंतरावर अंजनी मातेचे मंदिर असून ते ब-यापैकी प्रशस्त असल्यामुळे मुक्काम करण्यास योग्य आहे. थोडे पुढे गेल्यानंतर दोन वाटा लागतात. एक डावीकडे सीता गुहेपाशी पोहोचते तर दुसरी समोरच्या बालेकिल्ल्यावर चढते. बालेकिल्ल्यावर अंजनी मातेचे दुसरे प्रशस्त मंदिर आहे. किल्ल्याच्या पठारावरुन वेतरणा, गंगापूर, मुकणे, दारणा, कश्यपी व गौतमी-गोदावरी धरणाचा विस्तार पाहण्यासारखा असून या गडावरून दिसणारा त्र्यंबक आणि नाशिक शहराचा परिसर सुध्दा आपल्याला भौगोलिक माहिती करून देतो .पावसाळ्यात इथल्या पाय-यांवरून चालताना खुपच कसरत करावी लागते. पहिल्या टप्प्यातल्या डोंगर चढाई त्यानंतर लागणारा पठारी भाग थकवा घालवण्याचं काम करतो. यानंतरची चढाई थोडी अवघड असली तरीपण अनेक स्टॉप पॉईन्ट असल्यामुळे थकवा जाणवत नाही. अंजनेरी पर्वतावर पोहचण्यासाठी जवळपास चार तासांचा अवधी लागतो. त्यामुळे तुम्ही जर वेगळा विकेण्ड साजरा करण्याच्या मुड़मध्ये असाल तर अंजनेरीचा किल्ला एक उत्तम पर्याय आहे.
माहिती संकलन: प्राची तुंगार
Thursday, January 21, 2021
किल्ले रायगड, महाराष्ट्र.
![]() |
| किल्ले रायगड |
संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. गडकोट हेच राज्य. गडकोट म्हणजे राज्याचे मूळ. गडकोट म्हणजे खजिना. गडकोट म्हणजे सैन्याचे मूळ. गडकोट म्हणजे राज्य लक्ष्मी. गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण असे रामचंद्रपंत अमात्य यांनी आपल्या आज्ञापत्रात लिहिले होते.
हे सारेच्या सारे वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वच किल्ल्यांसाठी आहे. तथापि महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या किल्ले रायगडला तर ते तंतोतंत लागू पडते. रायगड-अलिबाग जिल्ह्यात असलेल्या या किल्ल्याला दरवर्षी लाखो पर्यटक, शिवप्रेमी भेट देऊन छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळी नतमस्तक होतात आणि नवप्रेरणा घेऊन मोठ्या उत्साहात छत्रपतींचे गुणगाण गातात. अगदी दोन दिवसाची सुट्टी लक्षात घेऊन आपण गडकिल्ले रायगडवर जाऊन याची देही याची डोळा महाराष्ट्राची अस्मिता हृदयात साठवू शकतो. त्यासाठीची ही थोडक्यात माहिती... महाराष्ट्राची अस्मिता असलेला रायगड किल्ला हा कोकणाच्या ऐतिहासिक वैभवाची महत्वपूर्ण साक्ष म्हणून मोठ्या गौरवाने अलिबाग-रायगड जिल्ह्यात लाखो पर्यटकांना शिववैभवाची व शिवपराक्रमाची कहाणी सांगत उभा आहे.
६ जून १६७४ रोजी याच किल्ल्यावर शिवछत्रपतींचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती झाले. हिंदवी स्वराज्याची ही एक महत्वपूर्ण घटना असून महाराजांची राजधानी म्हणून रायगड किल्ल्याला अनन्यसाधारण महत्व आहे . महाड या शहरापासून अवघ्या २४ कि.मी. अंतरावर पाचाड हे गाव आहे.
या गावात राजमाता जिजाऊंचा वाडा, समाधी हे पवित्र तिर्थस्थळ आहे. येथील दर्शनाने मन शांत होऊन किल्ला रोहणास सुरूवात करता येते. पाचाडच्या चित्त दरवाज्यापासून ३ कि.मी. अंतरावर रायगड किल्ला आहे. रायगडावर चढण्यासाठी १४५० पायऱ्या चढून जावे लागते. यासाठी साधारण दोन तास सहज लागू शकतात. तथापि सध्या रायगडावर जाण्यासाठी ‘रोपवे’ची व्यवस्था झाली आहे.
![]() |
| महादरवाजा |
रायगडावर पाहण्यासारखी बरीच स्थळे आहेत. त्यात होळीचा माळ, भवानी मंदिर, चित्त दरवाजा, खुबलढा बुरुज, महादरवाजा, मेणादरवाजा, राणीवसा, पालखी दरवाजा, राजभवन, राजसभा, गंगासागर तलाव, नगारखाना, जगदिश्वर मंदिर, बारा टाकी, वाघ दरवाजा, टकमक टोक, रामेश्वर मंदिर व शिवछत्रपती समाधी इत्यादी ठिकाणे आहेत. महाराजांच्या होळी माळावरील सिंहासनाधीश्वर पुतळा दारुची कोठारे अशीही अनेक स्थळे नजरेत व हृदयात साठवण्यासारखी आहेत.राजधानीस आवश्यक असलेले गुण किल्ले रायगडमध्ये शिवरायांना आढळले. त्यामुळेच त्यांनी या गडाची राजधानी म्हणून निवड केली. प्रचंड उंची, वर जाण्याचा एकच मार्ग, अतिशय विस्तृत पठार या सर्व गोष्टीबरोबरच रायगडाची समुद्राशी असलेली जवळीक, आणखी काय हवे होते. दुरदृष्टीपणा हा महाराजांचा महत्वपूर्ण गुण. त्याचीच साक्ष या किल्ल्याची निवड सहजतेने देते.
![]() |
| जगदिश्वर मंदिर |
हिरोजी इंदुलकर यांना रायगडावर राजधानी करण्यासाठी बांधकाम करण्यास महाराजांकडून आदेश प्राप्त झाला आणि आपले संपूर्ण कसब पणाला लावून त्यांनी या किल्ल्यावर राजसभा, राजनिवास, न्यायसभा, कल्याणसभा, विवेक सभा, दारु कोठारे, अंबरखाने, मंत्र्यांची निवासस्थाने, कचेऱ्या, नगरपेठ, किर्तीस्तंभ, तलाव, मंदिरे, खलबतखाना, हत्तीशाळा, अश्वशाळा वस्त्रागार, रत्नागार, जगदीश्वर प्रासाद, करमणुकीची स्थाने याबरोबरच गडाच्या संरक्षण व्यवस्थेतील कडे तासणे, तटबंदी बांधणे, महाद्वार आणि बुरुज, चोरवाटा उभारल्या.
![]() |
| हिरोजी इंदुलकर यांची स्वामिनीष्ठा |
किल्ल्यावर जाण्यासाठी चढण सुरू करताच काही वेळात उजव्या बाजूस खुबलढा बुरुज लागतो. पायथ्यांच्या खिंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही बुरुजाची जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. इथून पुढे जाताना डाव्या बाजूस उंच कडा दिसतो ते टकमक टोक आणि उजव्या बाजूस हिरकणी टोक दिसते. महाद्वाराकडे जाण्यासाठी दुसरी वाट नाना दरवाज्यातून जाते. मात्र उंच चढण व उंच पायऱ्या यामुळे ही वाट परीक्षा पहाते. दोन बुलंद बुरुजांच्या मध्ये असणाऱ्या या महाद्वाराची बांधणी अतिशय मजबूत आहे.
काळ्या दगडांची ही सुबक बांधणी आतल्या अंगास पहारेकऱ्यांच्या देवड्यांनी युक्त आहे. दरवाज्याच्या कमानीवर दोन्ही बाजूस राजसत्तेचे प्रतिक असलेले सिंहासारखे शरभ हे प्राणी कोरलेले आहेत.
पुढे गेल्यावर आपणास एक तलाव दिसतो हाच तो हत्ती तलाव. तेथून काही अंतरावर आणखी एक भव्य भव्य असा गंगासागर तलाव दिसतो. एका बाजूने चिरेबंदी दगडी बांधणीने बंदिस्त केलेला हा तलाव आजही रायगडावरील पाणीपुरवठयाचे काम करतो. पुढे महाराजांचा राजवाडा, राणीवसा ओलांडून आपण सिंहासनाच्या चौथऱ्यापाशी येतो. येथे धातूच्या सुंदर नक्षीकामाने मढविलेली मेघडंबरी आहे.
येथेच समोरील बाजूस नगारखान्याची इमारत असून सिंहासन ते नगारखाना जवळपास १६० फुटाचे अंतर आहे. मात्र नगारखान्याजवळ बोललेले सिंहासनाजवळ उभे राहिल्यासही स्पष्ट ऐकू येते. पुढे होळीचा माळ तसेच तेथे असलेला शिवरायांचा सिंहासनारुढ पुतळा, माळाच्या डाव्या बाजूस असलेले शिकाई मंदिर, पुढे बाजारपेठ आणि जगदीश्वराचे मंदिर, दरम्यान डावीकडे असलेले टकमक टोक शिववैभवाची साक्ष देत शिवभक्तांना प्रेरणा देत उभे आहेत. जगदीश्वराच्या पुढील बाजूस छत्रपतींची समाधी आहे. आलेला प्रत्येक शिवभक्त हा येथे नतमस्तकच होतो आणि शिवसमाधीचे तेजस्वी स्वरुप नजरेत भरुन पावतो.
![]() |
| शिव समाधी |
![]() |
| छत्रपती शिवाजी महाराज यांचा आवडता कुत्रा वाघ्याची समाधी |
कसे जाल?
विमान -
सर्वात जवळचे विमानतळ म्हणजे लोहेगाव विमानतळ, पुणे आणि छत्रपती शिवाजी विमानतळ, मुंबई, महाराष्ट्र.
रेल्वे-
बहुतेक पर्यटनस्थळांसाठी सर्वात जवळची रेल्वे स्थानके मुंबई (सीएसटी), एलटीटी, कुर्ला टर्मिनस, पुणे रेल्वे स्टेशन आणि पनवेल रेल्वे स्थानक (रायगड जिल्ह्यातील) भारतीय रेल्वेच्या मुख्य मार्गासाठी आहेत. रायगड जिल्ह्यातील कोकण रेल्वेची सर्वात जवळची रेल्वे स्थानके पेण, रोहा, वीर इत्यादी आहेत. पर्यटक त्यांच्या सोयीनुसार कोकण रेल्वेवरील सर्वात जवळचे स्थानिक रेल्वे स्थानक निवडू शकतात.
बसने-
रायगड जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरे व पर्यटन स्थळे महाराष्ट्र राज्य रस्ता परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) बसमार्गे रस्त्यांद्वारे जोडली गेली आहेत. रायगड जिल्हा सायन पनवेल द्रुतगती महामार्गाद्वारे मुंबईला जोडलेला आहे. पनवेल, खालापूर आणि खोपोली मार्गे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि एनएच ४ जाते. पनवेल येथून सुरू होणारी एनएच १७ पोलादपूर पर्यंत जाते.
सोयी- गडावर महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळाची निवासस्थाने आहेत. शिवाय खाजगी हॉटेलमध्येही निवासाची सोय होऊ शकते. शिवभक्तांनी दोन दिवसांचा वेळ काढून रायगड किल्ल्याचे दर्शन घेण्यास हरकत नाही.
Monday, January 18, 2021
अंबोली घाट, महाराष्ट्र.
आंबोली
आदिवासी क्षेत्रातील किल्ले
आदिवासी क्षेत्रातील किल्ले महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील ठाणे, पालघर तसेच उत्तरेकडील नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आदिवासीबहुल भाग ...
-
शिवजन्म स्थळ, किल्ले शिवनेर. शिवनेरी किल्ला - ३५०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगररांगेतील हा...
-
प्रतापगड महाबळेश्वर पासून महाड रस्त्याला २१ कि.मी.अंतरावर प्रतापगड आहे. दि.१० नोव्हे.१६५९ रोजी या किल्ल्यावर छ. शिवाजी महाराज आणि अफजलखान य...
-
त्र्यंबकेश्वर जवळ हनुमानाचं जन्मस्थळ म्हणून ओळखला जाणारा अंजनेरी पर्वत देव दर्शनाच्या दृष्टीनं जितका महत्त्वाचा तितकाच ट्रेकींगचा थ्रिलिंग...












