त्र्यंबकेश्वर जवळ हनुमानाचं जन्मस्थळ म्हणून ओळखला जाणारा अंजनेरी पर्वत देव दर्शनाच्या दृष्टीनं जितका महत्त्वाचा तितकाच ट्रेकींगचा थ्रिलिंग अनुभव देणारा. नाशिक-त्र्यंबक मार्गाच्या साधारणपणे ३० किलोमीटर अंतरावर अंजनेरीला जाण्यासाठी फाटा आहे. मारूतीरायाचं दर्शन घेतल्यावर अंजनेरी पर्वत चढाईसाठी मार्गक्रमण सुरू होतं. रस्त्यात लागणारं अंजनेरी गाव ओलांडून अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी येताच या डोंगराची विशालता लक्षात येते. अंजनेरी गावातून किल्ल्यावर पोहोचताच वाटेतच म्हणजे पाय-यांच्या ठिकाणी गुहेत जैनधर्मीय लेणी आढळतात. काही अंतरावर अंजनी मातेचे मंदिर असून ते ब-यापैकी प्रशस्त असल्यामुळे मुक्काम करण्यास योग्य आहे. थोडे पुढे गेल्यानंतर दोन वाटा लागतात. एक डावीकडे सीता गुहेपाशी पोहोचते तर दुसरी समोरच्या बालेकिल्ल्यावर चढते. बालेकिल्ल्यावर अंजनी मातेचे दुसरे प्रशस्त मंदिर आहे. किल्ल्याच्या पठारावरुन वेतरणा, गंगापूर, मुकणे, दारणा, कश्यपी व गौतमी-गोदावरी धरणाचा विस्तार पाहण्यासारखा असून या गडावरून दिसणारा त्र्यंबक आणि नाशिक शहराचा परिसर सुध्दा आपल्याला भौगोलिक माहिती करून देतो .पावसाळ्यात इथल्या पाय-यांवरून चालताना खुपच कसरत करावी लागते. पहिल्या टप्प्यातल्या डोंगर चढाई त्यानंतर लागणारा पठारी भाग थकवा घालवण्याचं काम करतो. यानंतरची चढाई थोडी अवघड असली तरीपण अनेक स्टॉप पॉईन्ट असल्यामुळे थकवा जाणवत नाही. अंजनेरी पर्वतावर पोहचण्यासाठी जवळपास चार तासांचा अवधी लागतो. त्यामुळे तुम्ही जर वेगळा विकेण्ड साजरा करण्याच्या मुड़मध्ये असाल तर अंजनेरीचा किल्ला एक उत्तम पर्याय आहे.
माहिती संकलन: प्राची तुंगार
No comments:
Post a Comment