शिवजन्म स्थळ, किल्ले शिवनेर. |
इतिहास
‘जीर्णनगर’. ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे शहर इसवीसनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मीती करण्यात आली. सातवाहनाची सत्ता स्थिरवल्यानंतर येथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतली. सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक-उल-तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला इ.स.अ १४७० मध्ये मलिक-उल-तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंदी करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्युनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजामाता गरोदर असताना जाधवरावांनी ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. त्याऊपर शिवाजीराजे यांचा जन्म झाला. शके १५५६ क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार इ.स. १६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरुद्धा येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. इ.स. १६७३ मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले. पुढे ४० वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहुमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्याकडे हस्तांतरीत करण्यात आला
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणेे
सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर येतांना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यावर मुख्य वाटसोडून उजव्या पूढे गेल्यावर ‘शिवाई देवीचे’ मंदिर लागते मंदीराच्या मागे असणाऱ्या कड्यात ६ ते ७ गुहा आहेत. या गुहा मुक्कामासाठी अयोग्य आहेत. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे. शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. आजमितीस या अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. मात्र पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात. एक वाट समोरच असणाऱ्या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते. वाटेत गंगा, जमुना व याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात. जिजाउंच्या पुढ्यात असलेला बालशिवाजी , हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे, अशा आवीर्भातील मायलेकरांचा पुतळा ‘शिवकुंजा; मध्ये बसविला आहे. शिवकुंजासमोरच कमानी मशिद आहे आणि समोरच खाली पाण्याचे टाके आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो. येथूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलॊत जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथे शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला आहे. इमारतीच्या समोरच ‘बदामी पाण्याचे टाके’ आहे येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो. सुमारे दिड हजार फुट उंचीचा ह्या सरळसोट कड्याचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे. गड फिरण्यास २ तास पुरतात. वर किल्ल्यावरून चावंड, नाणेघाट आणि जीवधन तसेच समोर असणारा वडूज धरणाचा जलाशय लक्ष्य वेधून घेतो.
गडावर जाण्याच्या वाटा
गडावर जाण्याच एदोन प्रमुख मार्ग जून्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते.
साखळीची वाट
या वाटेने गडावर यायच एझाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने शिवपुतळ्यापाशी यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात. डाव्या बाजूस जाणाऱ्या रस्त्याने साधारणतः एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरसमोर जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या साह्याने आणि कातळाट खोदलेल्या पाऱ्यांच्या साह्याने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो.
सात दरवाज्यांची वाट
शिवपुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायऱ्यांपाशी घेऊन जातो . या वाटेने गडावर येतांना सात दरवाजे लागतात. पहिला महारदवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा, या मार्गेकिल्ल्याव्र पोहचण्यासाठी दीड तास लागतो.
मुंबईहून माळशेज मार्गे
जुन्नरला येतांना माळशेज घाट पार केल्यावर ८ ते ९ किलोमीटवर ‘शिवनेरी १९ कि.मी.’ अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेशा खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहचण्यास एक दिवस लागतो.
या किल्ल्यावर शिवकुंजाच्या मागील बाजूस असणाऱ्या वऱ्हांड्यामध्ये १० ते १२ जणांची रहाण्याची सोय होते. किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती व्यवस्था आपण स्वतःच करावी. गंगा व जमुना या टाक्यांमध्ये बारामही पिण्याचे पाणि उपलब्ध आहे. गडावर जाण्यासाठी साखळीच्या मार्गेपाउण तास, सात दरवाजा मार्गे दीड तास लागतो.
माहिती संकलन - अमरीन पठाण
कृपया ब्लॉगला सबस्क्राईब/फॉलो करा म्हणजे पुढिल पोस्टचे अपडेट्स तुम्हाला मिळतील.
No comments:
Post a Comment